महावीर सांगलीकर
Senior Numerologist & Graphologist,
Phone No. 8149703595
राशिभविष्य: पेपरमध्ये रोज त्या-त्या दिवसाचं एखाद्या ओळीचं आणि दर रविवारी थोडं विस्तारानं आठवडाभराचं प्रत्येक राशीचं भविष्य येत असतं. हे भविष्य जनरलाईझड प्रकारचं असतं. त्यात कांही राशींचं भविष्य चांगलं, काहींचं थोडं चांगलं थोडं वाईट आणि काहींचं वाईट दिलेलं असतं. अनेकजण हे भविष्य गंभीरपणे तर इतर अनेकजण टाईमपास, करमणूक म्हणून वाचत असतात.
राशिभविष्य आणि तुमचं सुप्त मन
तुम्ही जेंव्हा तुमच्या राशीचं भविष्य वाचता, आणि असं भविष्य खरं ठरतं असं मानता, त्यावेळी तीन गोष्टी होऊ शकतात. पहिली म्हणजे ते भविष्य चांगलं असेल तर तुम्ही खूश होता, थोडं चांगलं थोडं वाईट असेल तर थोडं खूश, थोडं दु:खी होता आणि वाईट असेल तर काळजीत पडता. त्यातून तुमच्या सुप्त मनाला चांगला किंवा वाईट संदेश जातो.
जर तुमचं भविष्य चांगलं दिलं असेल तर तुमच्या सुप्त मनाला चांगला संदेश पोहोचतो. अॅटो सजेशनमुळं, लॉ ऑफ अॅट्रॅक्शननुसार पुढे खरंच कांही चांगल्या गोष्टी घडू शकतात. याउलट जर भविष्य वाईट लिहिलेलं असेल तुमच्या सुप्त मनाला वाईट संदेश जातो आणि प्रत्यक्षात खरंच वाईट घडू शकतं. सकाळी सकाळी तुम्ही ‘दिवस वाईट जाईल,’ ‘आरोग्य बिघडण्याची शक्यता’ असं भविष्य वाचलं तर तुमचा तो दिवस वाईट जाण्याचीच, तुमचं आरोग्य खरंच बिघडण्याची शक्यता.
तुम्ही हे भविष्य करमणूक किंवा टाईमपास म्हणून वाचलं असलं तरी त्याचा तुमच्या सुप्त मनावर परिणाम होणारच.
तुमचं भविष्य चांगलं लिहिलं आहे की वाईट आहे हे तुम्हाला तुम्ही ते वाचल्यावरच कळेल. पण मग विषाची परीक्षा घ्यायची कशाला? त्यापेक्षा तुम्ही ते न वाचलेलं बरं. राशिभविष्य वाचण्यापेक्षा तुम्ही तुमचं मन नेहमी पॉझिटिव्ह ठेवलं, आज तुम्हाला जसं पाहिजे आहे तसचं घडणार आहे असा विश्वास ठेवला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तुमचं भविष्य तुमची रास, ग्रहगोल यांच्यावर अवलंबून नसून ते तुमचं मन कशा प्रकारचा विचार करते यावर अवलंबून असतं.
एक लॉजिक वापरा. भविष्य 12 राशींचं दिलेलं असतं. समजा एखाद्या राशीचं भविष्य ‘आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील ‘ असं दिलं आहे. आता हे भविष्य त्या राशीच्या सगळ्याच लोकांच्या बाबतीत लागू होईल का? पण त्या राशीचे जे लोक राशीभविष्य वाचतात, त्यांच्यातल्या कमकुवत मनाच्या लोकांना आरोग्याची तक्रार होण्याची खरेच शक्यता असेल.
मुळात भविष्य लिहिणाऱ्यानी निगेटिव्ह भविष्य लिहायचं टाळलं पाहिजे. पण तेवढं तारतम्य त्यांना नसतं, आणि तुम्ही त्यांना समजाऊनही सांगू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही राशिभविष्य वाचण्याचं टाळलं पाहिजे.
भविष्य ही घडवण्याची गोष्ट आहे
माझं हे म्हणणं केवळ राशिभविष्यापुरतं मर्यादित नसून एकूणच भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेबद्दल आहे. तुम्हा तुमचं भविष्य जाणून घ्यायच्या भानगडीत पडूच नये. भविष्य ही जाणून घ्यायची गोष्ट नसून घडवण्याची गोष्ट आहे. म्हणजे तुमचं भविष्य तुम्हीच घडवायचं आहे. कोणतेही ग्रहगोल तुमचे भविष्य घडवू शकत नाहीत आणि बिघडवूही शकत नाहीत.
तुमच्या भविष्याचे मुख्य निर्माते तुम्हीच आहात. फारतर तुमच्या जवळच्या लोकांमुळे, म्हणजे तुमचे पालक, पती/पत्नी, सासू, संगतीतले मित्र यांच्यामुळे तुमचं भविष्य घडण्याला सहाय्य होऊ शकते, किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला अडथळे येऊ शकतात. त्यामुळं तुम्ही राशिभविष्याचा, ग्रहस्थितीचा विचार करण्यापेक्षा कर्माच्या सिद्धांतावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि नातेसंबंध, मित्रव्यवहार, लोकव्यवहार याचाही विचार केला पाहिजे.
हेही वाचा…..
Vastudosh: वास्तुदोष | वास्तुमध्ये खरंच कांही दोष असतो का?
Name Correction – नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!
Numerology: 8 हा अंक अनलकी नाही…
साडेसातीपासून मुक्तीचा सोपा उपाय!
Numerology Consultancy: अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा
One thought on “राशिभविष्य वाचू नका! तुमचं भविष्य तुम्हीच घडवा!”